नमो शेतकरीच्या हप्त्याची तारीख ठरली, या तारखेला खात्यात येनार
राज्यातील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने यापूर्वीच हप्त्यासाठी निधी मंजूर केला असला तरी, वितरणाची नेमकी तारीख जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, आता स्वतः कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ९ सप्टेंबर २०२५ पासून या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, हा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने विचारला जात होता. आधी १७ सप्टेंबर २०२५ च्या आसपास हा हप्ता वितरीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, शेतकऱ्यांमधील प्रतीक्षा आणि वाढता रोष लक्षात घेता, राज्य शासनाने तातडीने निर्णय घेतला असून, आता ९ सप्टेंबर २०२५ पासूनच हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
नमो शेतकरीच्या हप्त्याची रक्कम ९ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
मिळालेल्या माहितीनुसार, ९ किंवा १० सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करून या हप्त्याच्या वितरणाचा शुभारंभ केला जाईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया (Direct Benefit Transfer – DBT) सुरू होईल. साधारणपणे १० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा केली जाईल, अशी अपेक्षा आहे. आजपासूनच या वितरणासाठी आवश्यक असलेल्या एफटीओ (FTO – Fund Transfer Order) जनरेट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणे अपेक्षित आहे.