राशनऐवजी आता थेट खात्यात पैसे, या 26 लाभार्थ्यांना होनार फायदा
राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील केशरी (APL) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित (Direct Benefit Transfer – DBT) करण्याच्या योजनेला अखेर गती मिळाली आहे. यासाठी ४४ कोटी ८९ लाख ८२ हजार ६५० रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ४ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय (Government Resolution) काढून हा निधी वितरतीत केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांतील एकूण २६ लाख १७ हजार ५४५ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. गेल्या काही काळापासून हे अनुदान प्रलंबित असल्याने शेतकरी मोठ्या प्रतीक्षेत होते, अखेर ही प्रतीक्षा आता संपली आहे.
यापूर्वी या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना १५० रुपये दिले जात होते. मात्र, २० जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार या रकमेत वाढ करण्यात आली असून, आता प्रत्येक पात्र लाभार्थ्याला दरमहा १७० रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ही योजना एकदाच नसून, एक निरंतर प्रक्रिया म्हणून राबवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) खाते उघडून त्यामार्फत डीबीटीद्वारे निधी वितरित करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती. मात्र, यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने निधी वितरणास विलंब होत होता. आता शासनाने हे अडथळे दूर करून निधी वितरणाचा मार्ग मोकळा केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नेमून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.
राशनऐवजी आता थेट खात्यात पैसे ; या’ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश
या योजनेअंतर्गत खालील १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे..
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी.
विदर्भ: अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा.
जिल्हानिहाय लाभार्थी संख्या:
अकोला: १,३९,४४७
अमरावती: २,७४,०१२
बीड: ४,५२,९९९
बुलढाणा: २,१८,५६२
छत्रपती संभाजीनगर: २,१४,२२१
धाराशिव: १,९८,४७२
हिंगोली: १,४६,२८७
जालना: १,०२,७५१
लातूर: १,९८,८६१
नांदेड: २,८५,०२२
परभणी: १,८८,४१४
वर्धा: ७,७६३
वाशिम: ३१,८०५
यवतमाळ: २,०४,४२९
शासनाने निधी मंजूर केला असून, आता लवकरच हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. साधारणपणे येत्या १० ते १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान खात्यात जमा झाले आहे की नाही, हे तपासण्यासाठीची प्रक्रिया आणि बँक खात्याची माहिती कशी तपासावी, याबद्दलची माहिती लवकरच उपलब्ध करून दिली जाईल.