नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली..निधी मंजूर, लवकरच येनार खात्यात
राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षा अखेर संपली आहे. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
नमोच्या हप्त्याची राज्यातील ९४ लाख शेतकरी प्रतिक्षा करत होते. तसेच योजना बंद झाली, या अफवेने जोर धरला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या मंजूर झालेला सातवा हप्ता हा एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीसाठी आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये मिळतात. त्यामध्ये भर घालून राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेद्वारे स्वतंत्रपणे वार्षिक ६,००० रुपयांची आर्थिक मदत देते.
नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली
कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेच्या २० व्या हप्त्याच्या आकडेवारीच्या आधारे राज्य शासनाकडे सातव्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली होती. या निधीमधून पात्र लाभार्थ्यांव्यतिरिक्त, ज्या शेतकऱ्यांची ‘पीएफएमएस’ नोंदणी प्रलंबित आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्यातून वगळले गेले आहे, त्यांनाही लाभ दिला जाणार आहे.
हा निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यात कोणताही गैरव्यवहार होणार नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. हा शासन निर्णय नियोजन आणि वित्त विभागाच्या सहमतीने जारी करण्यात आला आहे.